माझा डोळा चुकवून ती दांडीयाला पळते
तिला हजारदा नको म्हणालो तरी ती गरबा खेळते ....
प्रत्येक दिवशी नविन रंग
तिच्या नटण्याचे नवे नवे छंद ..
मी देवदास गॅलरीत उभा
माझी पारो टीप-यात दंग !..
माझ्या काळजाची घालमेल तिला कुठे कळते ...
तिला हजारदा नको म्हणालो तरी ती गरबा खेळते ....
आज नको जाऊस राणी
हव तर मीच भरतो पाणी..
माझ्या हातात हांडा देउन
ती मेकअप करते शहाणी !..
आज फ़क्त बघायला जाते म्हणून हळूच घराबाहेर पडते
तिला हजारदा नको म्हणालो तरी ती गरबा खेळते ....
मला गरबा येत नाही
आणी तिचा काही सुटत नाही..
उशीर झाला म्हणून डबा नसतो
ती सकाळी लवकर उठत नाही !..
लवकर झोप म्हणालो तर माझी उशी सोफ़्यावर नेउन ठेवते ..
तिला हजारदा नको म्हणालो तरी ती गरबा खेळते ....
कधी कधी मी टिप-या लपवतो
कपाटाच्या किल्ल्या हरवतो ..
नउ दिवस बागडणा-या चंद्राला
मी नजर कैदेत बसवतो !..
जन्म कैद झाल्यासारखी ती हूंदके देउन रडते ..
तिला हजारदा नको म्हणालो तरी ती गरबा खेळते ....
मी जा म्हणतो दुस-या दिवशी
नाकावर राग... ऎकेल तरी कशी ..
"मी नाही जात जा " म्हणून
फ़ोडते घरातल्या कपबशी !...
चंद्र असुनही घरात माझ्या चक्क आमावस्या पसरते
तिला हजारदा नको म्हणालो तरी ती गरबा खेळते ....