Thursday, October 7, 2010

म्हणून मला पावसात चिंब भिजायला आवडत....

मुसळधार पावसात भिजून चिंब व्हायचं
थंडगार वाऱ्याच्या स्पर्शाने
शहारून गारठून जायचं
म्हणून मला पावसात चिंब भिजायला आवडत

तू छत्री काढणार पण
मी मात्र असूनही नाही म्हणायचं
मग एकाच छत्रीतून दोघांनी
एकत्र अर्धवट भिजत जायचं
उगाच खर्च नको सांगत
रिक्षेला नाही म्हणायचं
म्हणून मला पावसात चिंब भिजायला आवडत


छत्री पुरत नसूनही
तसंच भिजत चालत राहायचं  
एकाच छत्रीत चालताना
चोरून एकमेकांना बघायचं
उगीच खोडी काढायची म्हणून
मी चिखल उडवत चालायचं
हवहवसं असूनही तू
उगाच लटक रागवायचं
म्हणून मला पावसात चिंब भिजायला आवडत

आज तू सोबत सोडलीस
तरी मी एकटच चालायचं  
छत्री सोबत असते
पण स्वतालाच नाही म्हणायचं
खर्च जमतो
पण तरीही रिक्षेला टाळायच  
चालता चालता तुझ्या
आठवणीत मी रमायचं
स्वतःवरच जाता जाता
चिखल उडवून घ्यायचं
तुला येणारा राग आठवत
स्वतःचच समाधान करून घ्यायचं
सगळ्या घटना आठवत
हळूच मग रडायचं  
पावसानेही माझ्या अश्रूत
अलगद त्याच पाणी मिसळायचं
कळलच कोणाला तर
पावसाच पाणी आहे सांगत उडवून लावयच  
म्हणून मला पावसात चिंब भिजायला आवडत