त्या दिवशी मी तुला प्रथम पाहिलं होतं. कपाळावर थोडे पुढे आलेले मऊ, सरळ केस, शांत नजर, शिडशिडीत बांधा, उमदं व्यक्तिमत्त्व..!
आमच्या शेजारी राहणाऱ्या तुझ्या नातेवाईकांकडे तू आला होतास. तासाभराने निघून गेलास. हुरहूर मागे ठेवून...
त्या वेळी माझी गत अगदी 'काय बाई सांगू, कसं गं सांगू?' या गाण्यातल्या मुलीसारखी झाली होती.
तुझं दुसरं दर्शन मला दिवाळीच्या दिवशी झालं. तू पुन्हा शेजारीच आला होतास. त्या दिवाळीत मी मात्र
अचानक आलेल्या पावसात जणू चिंब भिजले होते. त्यानंतर तू परदेशात गेल्याचं समजलं. आनंद झाला खरा! पण तुझं दर्शन दुर्लभ होऊन बसलं. ओळख वगैरे तसंच राहिलं. तुझ्यापर्यंत पोहोचणं अशक्य होतं. पृथ्वी गोल आहे. त्यामुळे परत भेट होईल, या आशेवर होते मी! ...
आणि खरंच...
एक दिवस तू अचानक समोर आलास.
तुला पाहून माझ्या हृदयाची धकधक थांबली जणू. मी काय बघते आहे, करते आहे, शोधते आहे, मलाच कळत नव्हतं. तुझ्या नजरेतून माझी ती स्थिती सुटली नसेल. पण काय करू, माझा स्वत:वर ताबाच राहिला नाही. मी विरघळून जातेय, असंच वाटलं मला.
हे सगळं माझं एकटीचंच गुपित होतं आजवर. मी कुण्णाकुण्णाला त्याचा पत्ता लागू दिला नाही. आजच मी हे सगळं सांगतेय. अरे, तुझ्या नकळत किती आणि काय काय शेअर केलं मी तुझ्या बरोबर, काय सांगू? देवळातली शांतता, पहाटेचा गार वारा, समुदाकाठचा सूर्यास्त, विजा कडकडताना पडणारा पाऊस, डोंगरमाथा आणि बोटीवरचा डेकसुद्धा!
गाढवा (हे प्रेमाने हं!) किती रात्री जागवलंस मला. सगळीकडे माझ्या आसपास असतोस. पण खराखुरा नसतोसच. देव सगळीकडे आहे, पण दर्शनाला देवळात जातातच ना? तसंच समज. तुझ्या अस्तित्वाने सगळं सुगंधी होत जातं. तुझ्याशी जोडलेलं हे नातं मी असंच जपणार आहे. तुझी परवानगी न घेता. चालेल ना? सोनेरी क्षणांचा सोबती असूनही अनभिज्ञ असलेला.
खरोखर गाढव, एक नाही, शंभर!