Thursday, October 7, 2010

आठवतं अजुनही ....

आठवतं अजुनही ....

आपलं ते...

कॉलेजच्या कँटीनमध्ये भेटणं...



तुझं पुन्हा पुन्हा,

मान वळवून बघणं...

आणि उधारीवर घेतलेल्या...

सिगारेटच्या धुरात,

माझं डोळ्यातलं पाणी दडवणं.



तु विचारलं होतस

का रे? काय चुकलं?

का झालीत अशी ...

आपल्या नात्याची शकलं?



मला तरी कुठे ठाऊक होतं

कुठल्या तरी बेसावध क्षणी...

मनाशी असलेलं..

माझंच नातं तुटलं होतं !



कदाचित तुला ...

गाडीतुन उतरताना पाहुन..

मला माझं ....

पंक्चर झालेली सायकल धरुन..

मैलोनमैल चालणं आठवलं होतं.



पोटापाण्याचा धंदा काय?

तुझ्या बापाचा प्रश्न ऐकुन

सुकलेल्या डोळ्यांसमोर

गळणारं माझं छप्पर दिसलं होतं...



आणि दिसल्या होत्या

सुरकुत्या...

माझ्या मायच्या डोळ्याखालच्या..

माझ्या नोकरीकडे डोळे लावुन बसलेल्या!



तुझ्या मुखचंद्रापेक्षा...

भावंडांच्या ताटातल्या...

भाकरीला मी महत्वाचं मानलं...

तुच सांग...माझं काय चुकलं?